मुंबई : भाजपाच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील थोड्याच वेळात गिरीश महाजन यांच्या मुंबईतल्या सरकारी बंगल्यावर पोहचणार आहेत. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांनाही वेग आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. या संदर्भात मुंबईत विखे पाटलांकडे बैठक झाल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. या बैठकीत काँग्रेस सोडण्याचा आणि भाजप प्रवेश करण्याचा निर्णय या नेत्यांनी घेतला.


अनेक नेते भाजपाच्या गळाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक ते सहा जून दरम्यान विखे पाटील आणि अब्दुल सत्तार यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासोबत चर्चा करून प्रवेशाचा मुहूर्त ठरवण्यात येणार आहे. या दोघांच्या पाठोपाठ काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरही भाजपाच्या मार्गावर आहेत... तर काँग्रेसचे आणखी एक आमदार जयकुमार गोरे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.


मातोश्रीवरही हालचालींना वेग


राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असताना महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानं या हालचालींना वेग आल्याचं मानलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्यानं भाजपाजवळ आलेले राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचा उचित सन्मान करण्यासाठी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.



गिरीश बापट यांच्याकडे असलेली अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि संसदीय कामकाज ही महत्त्वाची खातीही रिक्त होत आहेत. शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनाही मंत्रिपद मिळू शकतं, असं मानलं जातंय. दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेच्या वाट्याचं आरोग्यमंत्रीपद रिक्त आहे. या जागीही कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे. याखेरीज काही मंत्र्यांची खातीही बददली जाऊ शकतात.