मुंबई: ठाकरे सरकारमध्ये अपेक्षित खाते न मिळाल्याने नाराज असलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मदतीला त्यांचे जुने सहकारी आणि मित्र राधाकृष्ण विखे-पाटील धावून आले आहेत. ज्या लोकांनी काँग्रेस पक्ष वाढवला त्यांनाच आता डावलले जात आहे, असे मत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या मनात आपल्याला डावलले जात असल्याची भावान निर्माण झाल्याचे सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक चव्हाण यांनी कालच राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अशोक चव्हाण आणि माझे राजकारणाव्यतिरिक्त कौटुंबिक संबंध असल्याचे सांगितले. 


वडेट्टीवार नाराज, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी


यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली. बाळासाहेब थोरात यांना अपघाताने पक्षाचे नेतृत्व मिळाले आहे. त्यांनी आजपर्यंत कधीही तालुक्याबाहेरचा विचार केला नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचे खरे रुप कळेल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. 


अशोक चव्हाणांना येतेय जुने मित्र विखेंची आठवण?


दोन दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आले होते. यामध्ये दुय्यम खाती मिळाल्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते नाराज होते. यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही दांडी मारली होती. त्यामुळे आता भाजपकडून या नाराज नेत्यांना साद घालण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.