काँग्रेस म्हणजे पेन्शनरांचा क्लब झालाय, बरखास्त करून टाका- शिवसेना
राहुल यांनी केवळ ढोर मेहनत केली.
मुंबई: काँग्रेस पक्षाची अवस्था ही पोरखेळ किंवा पेन्शनरांचा क्लब असल्यासारखी झाली आहे. असा पक्ष चालवण्यापेक्षा तो बरखास्त केलेला बरा, या शब्दांत शिवसेनेने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस काँग्रेसमध्ये अंतर्गत घुसळण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना काही सल्ले दिले आहेत.
यामध्ये म्हटले आहे की, लोकसभेतील पराभवाचे खापर एकट्या राहुल गांधी यांच्यावर फोडणे चूक असले तरी त्यांचा प्रचार हा दिशाहीन होता. राहुल यांनी केवळ ढोर मेहनत केली. राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्त्व लोकांना आकर्षित करीत नाही व त्यांची भाषणे, विचार करण्याची तसेच भूमिका मांडण्याची शैली प्रभावी नाही. त्यांच्याकडे मोतीलाल, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांच्यासारखा वैयक्तिक करिष्मा नाही. ते फक्त सोनिया गांधींचे पुत्र आहेत, हेच त्यांचे कर्तृत्व म्हणावे लागेल. सोनिया गांधी यांच्याबाबतही तशीच परिस्थिती आहे. देशाच्या राजकारणात सोनिया गांधींचे कर्तृत्व राजीव गांधींची पत्नी इतकेच आहे, अशा शब्दांत शिवसेनेने गांधी घराण्यावर ताशेरे ओढले आहेत.
स्वत:च्या मुलांसाठी पक्षहित बाजूला सारलेत; राहुल गांधी बैठकीत 'या' नेत्यांवर संतापले
याउलट मोदी यांच्याकडे अमित शहा आहेत व अमित शहा यांच्याकडे संघटना बांधणीचे चातुर्य आहे. राहुल गांधींकडे एकतर पोरखेळ आहे किंवा पेन्शनरांचा क्लब आहे. त्यामुळे काँग्रेसचे स्वबळावर जिंकून येण्याचे दिवस संपले. आता मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांना घेऊन काँग्रेस चालवण्यापेक्षा पक्ष बरखास्त केलेला बरा, असा सल्ला शिवसेनेने राहुल गांधींना दिला आहे.