स्वत:च्या मुलांसाठी पक्षहित बाजूला सारलेत; राहुल गांधी बैठकीत 'या' नेत्यांवर संतापले

राहुल यांनी हा निर्णय घेतल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील.

Updated: May 26, 2019, 09:01 AM IST
स्वत:च्या मुलांसाठी पक्षहित बाजूला सारलेत; राहुल गांधी बैठकीत 'या' नेत्यांवर संतापले title=

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची (CWC)बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर चांगलेच संतापल्याची माहिती समोर आली आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा स्वत:च्या मुलांना अधिक महत्त्व दिल्याचा आक्षेप यावेळी राहुल गांधी यांनी घेतला. 

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या माहितीनुसार, राहुल गांधी यांचा रोख राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि पी. चिदंबरम यांच्या दिशेने होता. आपण नरेंद्र मोदींविरोधात उपस्थित केलेला राफेल गैरव्यवहार आणि 'चौकीदार चोर है', हे मुद्दे या नेत्यांनी जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले नाहीत. तिकीट वाटपाच्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्थानिक नेत्यांना संधी द्यावी, असे सुचवले होते. मात्र, या नेत्यांनी आपल्या मुलांनाच उमेदवारी मिळवून देण्यात धन्यता मानली. या सगळ्याला माझा विरोध असूनही तुम्ही आपले घोडे पुढे दामटले, अशा शब्दांत राहुल यांनी नेत्यांना सुनावले. 

राहुल गांधींच्या नकारात्मक प्रचारामुळे पक्षाचा पराभव; काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुजबूज

दरम्यान, या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला. आता काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती आणावी. आपण जनतेपर्यंत जाऊन नव्याने संघर्ष करू, असा राहुल गांधी यांचा आग्रह आहे. मात्र, काँग्रेस कार्यकारिणीने त्यांचा हा राजीनामा फेटाळला होता. परंतु, राहुल गांधी अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र, राहुल यांनी हा निर्णय घेतल्यास कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळेल. अनेक कार्यकर्ते आत्महत्या करतील, असे वक्तव्य पी. चिदंबरम यांनी केले. 

'काँग्रेसचा पराभव हे दुर्दैव, राहुल गांधींना राजीनामा देण्याची गरजच काय?'