मुंबई : गणेशोत्सव काळात कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या चाकरमान्यांची एकूण संख्या पाहता एसटी महामंडळासह रेल्वेकडूनही खास सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामागोमागच आता अलिबाग, मांडवा भागात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय आहे, समुद्रमार्गे अलिबागपर्यंतच्या प्रवासाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२० ऑगस्टपासून मुंबई ते अलिबागदरम्यान रो रो फेरी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ११ दिवसांसाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. भाऊचा धक्का ते मांडवा अशा मार्गावर ही रो रो सेवा सुरु होणार आहे. ज्याचा फायदा गणेशोत्सव काळात अलिबागच्या दिशेनं जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना होणार आहे. या सेवेमुळं रस्ते मार्गानं तीन तासांच्या प्रवासाऐवजी  अलिबागपर्यंतच्या प्रवासाठी ४५ मिनिटे इतकाच वेळ लागणार आहे.


दरम्यान, १५ मार्च रोजी ही सेवा सुरु झाली होती. पण, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं ही सेवा बंदच होती. पण, आता मात्र रुग्णसंख्या काही अंशी नियंत्रणात येत असल्याचं पाहून सुरु झालेल्या अनलॉकच्या टप्प्यामध्ये रो रो सेवेचाही समावेश झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


 


रो रो सेवेची काही वैशिष्ट्य


ग्रीसहून आलेल्या एम २ एम १(M2M1 Ship) हे जहाज १४  फेब्रुवारीला मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचलं होतं. या जहाजात १००० लोकांना चांगल्या हवामानामध्ये आणि ५०० लोकांना खराब हवामानात समुद्रमार्गे होणाऱ्या प्रवासासाठी सामावून घेण्याची क्षमता आहे. या जहाजात सर्व परिस्थितीमध्ये २०० कार सामावून घेण्याची क्षमता देखील आहे. इंधनाची बचत करुन वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी या सेवेची मदत होणार आहे. या जहाजातून प्रवासी त्यांच्या प्रवासासाठी तीन श्रेणीतून निवडू शकतात.