Mumbai Local Train Update: एप्रिल महिन्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. कडक उन्हामुळं प्रवाशांनाही प्रवास करणे खूप कठिण जात आहे. यासगळ्यावर आता प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्रालयाने स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची किती उपलब्धता आहे, याची चाचपणी केली आहे. तसंच, पुरेसा पाणीसाठा पुरवण्यात यावा यासाठी त्या विभागातील रेल्वे प्रशासनाला नियामावली जारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअंतर्गंत स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या सुविधा सुरू करणे, पंखे, शेड आणि एसीची दुरुस्तीयावर विशेष भर देणे, असे नमूद करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेने 434 स्थानकांत जल व्यवस्थेवर विशेष भर दिला आहे. 8,093 जल नल, 498 वॉटर कुलर आणि 149 ट्यूबवेलची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई विभागात 1200 पाण्याचे नळ, 245 वॉटर कुलर आणि 10 ट्यूबवेल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ज्या महत्त्वपूर्ण स्थानकात पाण्याचा कमी पुरवठा होतोय. तिथे पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मवर पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कमर्शल कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे निरीक्षण करण्यात येत आहे. महिला समित्या, स्वयंसेवी संस्था, स्काउट आणि गाईड आणि इतर बचत गटांकडून ट्रेनच्या सामान्य वर्गाच्या डब्याजवळ थंड पेय पाणी वाटपासाठी मदत घेतली जाईल.


रेल्वेचे शीतल अभियान 


उन्हाळ्यात नागरिकांना उन्हापासून थोडा बचाव व्हावा यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई विभागात शितल अभियानाची सुरुवात केली आहे. मुंबई सेंट्रल विभागांतर्गंत येणाऱ्या सर्व श्रेणीतील स्थानांसाठी किमान आवश्यक सुविधांच्या निकषांनुसार वॉटर कुलर आणि पाण्याच्या नळांची उपलब्धता निश्चित केली आहे. मुंबई सेंट्रलच्या संपूर्ण विभागात १९४ वॉटर कुलर कार्यरत आहेत.


रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना उष्णतेचा कसा सामना करावा, स्वतःला हायड्रेट कसे ठेवावे आणि उष्माघाताची समस्या उद्भवल्यास काय करावे, याविषयी जाणून घेण्यासाठी व प्रवाशांना माहिती देण्यासाठी स्टेशन परिसरात एक चेकलिस्ट तयार करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या सोशल मीडिया हँडल ‘WeRMumbai’ वर एक सोशल मीडिया अभियान सुरू करण्यात आलं आहे. येथे सामान्य नागरिकांना पाणी वाचवा आणि उष्णतेवर कशी मात द्याल यावर आधारित 30 ते 60 सेकंदाचे माहितीपर रिल अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. 


रेल्वेने बनवली चेकलिस्ट


स्थानकांत प्रवाशांसाठी पाण्याचे नळ, वॉटर कुलर, पंखे, एसी वेटिंग हॉल यासारख्या सुविधांची चाचपणी


पाण्याची उपलब्धतता सुनिश्चित करण्यासाठी पेयजल व्यवस्थेसाठी एनजीओसारख्या संस्थांकडून मदत घेण्याची योजना 


कव्हर शेडच्या खाली पंख्यांची उपलब्धता


ज्या स्थानकांवर कंत्राटदारांनी अद्याप वॉटर व्हेंडिंग मशिन बसवलेले नाहीत त्यांना महिनाभरात व्यवस्था करण्याचे अल्टिमेटम देण्यात आले आहे.