मुंबई : धावत्या लोकलमधून उडी मारलेल्या मुलीला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानानं मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आई लोकलमध्ये चढू शकली नसल्यानं मुलीनंही लोकलबाहरे उडी मारली. लोकलमधून उडी मारल्यावर प्लॅटफॉर्म आणि लोकल मध्ये असलेल्या जागेतून गाडी खाली जात असलेल्या मुलीला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी बाहेर खेचून तिचे प्राण वाचवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगावर शहारे आणणारा हा थरारक प्रसंग प्रत्यक्ष पाहणाऱ्या अनेक प्रवाशांनी त्या जवानांना कडक सलाम ठोकून अभिनंदन केले. सोनू सुलताना असं अपघातातून बचावलेल्या मुलीचे नाव आहे. भाईंदर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 4 वर शनिवारी सकाळी घडलेला हा थरारक प्रसंग रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.


भाईंदर पूर्वेकडील बाळाराम पाटील मार्गावर राहणारी सारिका सुलताना आपली मुलगी सोनू सुलताना हिच्या बरोबर भाईंदर येथून दहिसर येथील नातेवाईकांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घाईघाईने अंधेरी लोकल पकडत असताना महिलांच्या डब्यात सोनू चढून गेली लोकल सुरू झाल्यावर आपली आई सारिका खालीच प्लॅटफॉर्मवर राहिल्याचे दिसताच एका क्षणाचाही विचार न करता सोनूने चालत्या लोकल मधून खाली उडी घेतली.


सोनू लोकल आणि प्लॅटफॉर्म मधील जागेतून गाडी खाली जात असतानाच तेथे असलेले (आर.पी.एफ.) रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विनायक शिंदे आणि यामिनी कांत मिश्रा यांनी क्षणाचाही विलंब आणि जीवाची पर्वा न करता सोनूचा हात पकडून तिला खेचून बाहेर काढले. सोनू आपला मृत्यू आपल्याच डोळ्यांनी पाहत असतानाच जणू देवदूतांनी तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत वाचवले.