रेल्वे स्टेशन परिसरातील विक्रेत्यांचा कामगारांच्या जीवाशी खेळ
रेल्वे स्टेशन विक्रेत्यांचा कामगारांच्या जीवाशी खेळ
मुंबई : रेल्वे स्टेशन परिसरातील विक्रेते आपल्या कामगारांच्या जीवाशी खेळत असल्याचे समोर आलंय. घटकोपर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवरून फलाट क्रमांक दोनवर सामान नेण्यासाठी चक्क रेल्वे रूळ ओलांडत असल्याचं दिसतंय. एकीकडे रेल्वे रूळ ओलांडू नये, अशा रेल्वे प्रशासन सूचना करीत असतानाच दुसरीकडे रेल्वेचे अधिकृत विक्रेतेच आपल्या कामगारांसोबत जीवाशी खेळत आहेत.
रेल्वे रूळ ओलांडताना रोज अनेक जण मृत्यूमुखी पडत आहेत त्यावर जनजागृती ही केली जाते मात्र हे चित्र पाहून त्याचा काही उपयोग होतो आहे हे दिसत नाही, रेल्वे रूळ ओलांडणे हे कायद्याने गुन्हा ही आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन ठेकेदारांवर काही कारवाई करणार का, की पुढे असे प्रकार घडू नये, म्हणून पाऊल उचलणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
रेल्वे प्रवाशांनी रुळ ओलांडला तर त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. तसेच त्यांना समजही दिली जाते. मात्र, रेल्वेच्या आवारातील विक्रेत्यांना कोण समज देणार आणि दंडसह काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.