मुंबई : कोरोना काळात मुंबईच्या लोकल ट्रेनवर मोठा परिणाम झाला. फक्त अत्यावश्यक सेवेकरांसाठी सुरू असलेली लोकल आता सामान्यांकरता सुरू झाली. मात्र यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या दोन डोसचा नियम लागू आहे. या नियमासह 15 ऑगस्टपासून लोकल सामान्यांकरता सुरू झाली आहे. असं असताना लोकलच्या मासिक पासधारकांमध्ये वाढ झाली आहे. मध्य रेल्वेवर चार दिवसांत 92 हजार 324 मासिक पासची विक्री...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस उलटून गेलेल्या सामान्य प्रवाशांनी सोमवारीही रेल्वे स्थानकात मासिक पाससाठी धाव घेतली. त्यामुळे काही प्रमाणात मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकातील तिकीट खिडक्यांसमोर रांगा लागल्या होत्या.  मध्य रेल्वेवर ११ ते १५ ऑगस्ट या काळात इतर स्थानकांपेक्षा सर्वाधिक अर्थात ९२ हजार ३२४ मासिक पासची विक्री झाली. 


लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वसामान्य प्रवाशांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास खुला करण्यात आला आहे. परंतु गेले दोन दिवस सरकारी सुट्टीमुळे लोकलला म्हणावी तशी गर्दी झाली नव्हती. मात्र आता आठवड्यातील कामकाजाचा पहिला दिवस उद्या मंगळवारी असल्याने सकाळी लोकलमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने 95 टक्के फेऱ्या पूर्ववत सुरू केल्या आहेत.


राज्य सरकारने लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लोकलचा प्रवास खुला केला आहे. 11 तारखेपासून पात्र ठरलेल्या प्रवाशांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन 16 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत मध्य रेल्वेवर 1 लाख 13 हजार 733 पासची विक्री झाली होती. पश्चिम रेल्वेवरही आज सायंकाळपर्यंत एकूण 52 हजार 703 पासची विक्री झाली आहे. दोन्ही रेल्वे मिळून एकूण 1 लाख 66 हजार 436 पासची विक्री झाली आहे.


मध्य रेल्वेवर दररोज 1774 तर पश्चिम रेल्वेवर 1367 फेऱया धावतात, सध्या मध्य रेल्वे 1612 तर पश्चिम रेल्वे 1201 फेऱया चालवत होती. 16 तारखेपासून मध्य रेल्वेने 74 फेऱ्या वाढवून 1686 फेऱया चालविण्याचा निर्णय घेतला आहे, तर पश्चिम रेल्वेवर 99 फेऱ्या वाढवून त्या 1300पर्यंत केल्या आहेत. पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते डहाणूपर्यंत 550 आरपीएफ स्टाफ सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन पाळ्यांमध्ये 122 टीसींचा फौजफाटा नेमला आहे. मध्य रेल्वेच्या स्थानक आणि ट्रेनमध्ये पात्र प्रवाशांनी प्रवास करावा यासाठी टीसी तैनात करण्यात आले आहेत.