रेल्वे तिकीटांवरची मोफत विमा सेवा बंद
डेबिट कार्डद्वारे बुकिंग केल्यास बुकिंग शुल्कही माफ केले होते.
मुंबई: रेल्वेच्या आरक्षित तिकीटांवरची मोफत विमा सेवा बंद करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. आता हा प्रवासी विमा घेण्याचा पर्याय वैकल्पिक असेल. डिजीटल देवाण-घेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी २०१७ साली आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षित तिकीटांवर मोफत विमा सेवा देण्याचा निर्णय घेतला होता.
डेबिट कार्डद्वारे बुकिंग केल्यास बुकिंग शुल्कही माफ केले होते. प्रवाशाचा रेल्वे अपघाती मृत्यू झाला तर दहा लाख रुपयांपर्यंतच्या विम्याची तरतूद करण्यात आली होती. तर प्रवासी अपघाती दिव्यांग झाल्यास साडेसात लाख रुपये आणि अपघातात जखमी झाल्यास दोन लाख रुपये विम्याची तरतूद होती. तसेच मृतदेह नेण्यासाठी दहा हजारांची तरतूदही त्यामध्ये करण्यात आली होती.