मुंबई: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यंदा राज्यात ससासरीच्या १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा पावसाचं प्रमाण कसं असेल, त्यानुसार शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं याबद्दल कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय....


राज्यात चांगला पाऊस होईल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा राज्यामध्ये सरासरीच्या १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून ५ ते ७ जून दरम्यान मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज कृषी हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय. मान्सूनच्या आगमना पासून २० जून पर्यंत राज्यात चांगला पाऊस होईल. मात्र, त्यानंतर पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता असल्याचही त्यांनी सांगितल आहे. जून जुलै ऑगस्ट या तीनही महिन्यात पाऊस जरी चांगला असला तरी थोड्या काळात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात खंड अशी परिस्थिती राहणार असल्याचं साबळे यांनी सांगितलयं...राज्यातील १३६ दुष्काळी तालुक्यांमध्येही पावसाची कमतरता राहणार असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी त्याला अऩुसरुन पीक घ्यावं असंही त्यांनी सांगितलं.


३६ तासांत मान्सून होणार सक्रिय


 पुढच्या ३६ तासांत मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलाय.  केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आता पुढे सरकण्यासाठी अनुकुल परिस्थिती तयार झालीय. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या हवामानाच्या या स्थितीमुळे पुढील ४८ तासांनंतर दक्षिणेतील काही भागांत मान्सून शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवलीय. तर राज्याच्या किनारपट्टीच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची देखील शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेच्या हवामान विभागानं सांगितलं.