मुंबई आणि उपनगरात उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
मुंबई : रात्रीपासून मुबंईसह पश्चिम उपगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र रात्रीपासून मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी जमा होण्यास सुरवात झाली आहे. दहिसर चेकनाक इथे देखील पाणी जमा झाले होते. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या वाहतूकीवरदेखील परिणाम झाला.
गेले आठ दिवस कडकडीत उन्हामुळे हैराण झालेल्या रायगडकरांना सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाची संततधार सुरू आहे. अलिबागसह महाड, माणगाव, रोहा, सुधागड तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. आजच्या पावसाचा जनजीवनावर परिणाम झाल्याचं दिसून आलं. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अंबा, कुंडलिका नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. पावसाअभावी खोळंबलेल्या शेतीच्या कामांना पुन्हा वेग आला आहे.
वसईत रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसामुळे पुन्हा एकदा नालासोपारा तुंबलंय. सेंट्रल पार्क, अचोळे रोड, तुळींज रोड, गाला नगर परिसरात रस्त्यावर पाणी साचलं आहे.
नवी मुंबईतही रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. सकाळी मात्र पावसानं चांगलाच जोर धरलाय. पावसानं शहरभर काळोख पसरला आहे. पावसामुळे शहरातील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.