मुंबई : राज्यात वरुणराजानं दमदार कमबॅक केले आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस होतोय. मुंबई आणि मुंबई उपनगरात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. विश्रांतीनंतर सकाळी काही वेळ पुन्हा पावसाला सुरुवात झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या कांदिवली, मालाड, मुलुंड, भांडूप या उपनगरात पावसाचा रात्रभर जोर पाहायला मिळाला. तर पावसामुळे माळशेज घाट खबरदारीचा उपाय म्हणून दोन धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडकसागर धरण फुल्ल झालंय. येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. 


मोडकसागर धरणाची क्षमता १६३ मीटर इतकी आहे. मोडकसागरमधून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होतो. दरवर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांपैकी पवई तलाव सगळ्यात आधी भरतो. मात्र यंदा मुंबईत म्हणावा तितका पाऊस झालेला नाही. दुसरीकडे नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मोडकसागर आधी ओव्हरफ्लो झाले आहे. 


मुंबईला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालीय. वैतरणा नदीला पूर आला आहे. त्यामुळं नदीकाढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.