मुंबई: मुंबई आणि पुणे शहरासह राज्याच्या अनेक भागांमध्ये गुरुवारी पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तविण्यात आला आहे. आगामी काही तासांमध्ये अरबी समुद्रात वन आणि अम्फन ही दोन चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात. या चक्रीवादळांच्या प्रभावामुळे मुंबई, पुणे व नाशिक या प्रमुख शहरांमध्ये उद्या पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना सतर्क करण्यात आले आहे. गुरुवारपर्यंत खोल समुद्रात न जाण्याची सूचना मच्छिमारांना देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी क्यार आणि महा चक्रीवादळावेळी अरबी समुद्रात अशी परिस्थितीत निर्माण झाली होती. ही परिस्थिती दुर्मिळ मानली जाते. यंदाच्या वर्षात अरबी समुद्रात चार तर बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळांची या वर्षी निर्मिती झाली होती. यामध्ये आता अरबी समुद्रात पवन व अम्फन या दोन चक्रीवादळांची भर पडणार आहे. असे घडल्यास यंदाच्या वर्षातील वादळांची संख्या ९ वर पोहोचेल. यापूर्वी १९७६ मध्ये भारताला सर्वाधिक १० वादळांचा तडाखा बसला होता. पवन हे नाव श्रीलंकेच्या सूचनेवरून देण्यात आले आहे तर अम्फन हे नाव थायलंडच्या सूचनेनुसार देण्यात आले आहे.



या वादळाचा परिणाम मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रासह गोवा आणि दक्षिण गुजरातच्या भागांत दिसू शकतो. तर पवन चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार असून, ते सुरुवातीला वायव्य आणि त्यानंतर पश्चिम दिशेने पुढे सरकरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग हा प्रतितास ४० ते ५० किलोमीटर राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.