मुंबई : आजचा बुधवार हा मुंबईकरांसाठी दिलासा घेऊन आला आहे. रात्रभरात मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक जवळपास पूर्वपदावर आली आहे. मध्य रेल्वेची मेन लाईन आणि हार्बर मार्गावरची वाहतूक नियमित वेळापत्रकानुसार सुरु आहे. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक सखोल भागात गेल्या 3 दिवसांपासून पाणी साचतंय. नालासोपारा स्थानकाजवळ रुळ पाण्याखाली गेल्याने पश्चिम रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली. पावसानं विश्रांती घेतली असली, तरी मुंबईतल्या पश्चिम उपनगरवासियांची डोकेदुखी अद्याप संपलेली नाही.


पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यास आणखी काही काळ लागणार आहे. नालासोपाऱ्यात अजूनही रुळावरील पाण्याची पातळी खाली आलेली नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक अद्यापतरी भाईंदरपर्यंतच सुरू आहे. सुरक्षा चाचणीसाठी एक लोकल विरारहून चर्चगेटच्या दिशेनं सोडण्यात आली. इकडे बोरीवली-विरार लोकल वाहतूकही वेळापत्रकानुसार सुरु झालेली नाही. सकाळी सकाळी हजारो प्रवाशांचा स्टेशनवर खोळंबा होतो आहे. आज सकाळी विरारहून चर्चगेटच्या दिशेनं पाच गाड्या सोडण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे.