मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणी
मुंबईच्या वडाळा आणि सायन परिसरातही जोरदार पावसामुळे पाणी साचलं
मुंबई : मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यरात्री पावसानं जोरदार बॅटिंग केलीय. मुंबईतल्या दादर, शिवडी, परळ भागात रात्रभर मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी भरलं होतं. हिंदमाता परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं होतं. आता या भागातलं पाणी ओसरायला सुरुवात झालीय. मात्र चेंबूर, गोवंडी, मानखुर्दमध्ये पाऊस पडत असून या भागात पाणीही साचलंय.
दरम्यान मुंबईसह उपनगरी भागांत अति मुसळधार पाऊस येत्या ४ तासांत होणार असल्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्यायत. मुंबईत कुलाब्यामध्ये गेल्या १२ तासांत १७१ मिमी तर सांताक्रुझमध्ये ५८ मिमी पावसाची नोंद झालीय. मुंबईत कुलाबामध्ये दोन तासात ५२ मीमी पाऊस बरसला. मध्य आणि पश्चिम रेल्वे उशिरानं धावत आहेत.
सायन परिसर पाण्यात
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे मुंबतल्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. मुंबईच्या वडाळा आणि सायन परिसरातही जोरदार पावसामुळे पाणी साचलं. त्यामुळे वाहनांना मार्ग काढण्यात अडचणी येत होत्या. पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचारी रात्रभर काम करताना दिसून आले. पाणी साचल्यामुळे अनेकांच्या गाड्या बंद पडलेल्या दिसून आल्या.
मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सायनच्या रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचलंय. मध्य रेल्वेवरील वाहतूक सध्या तरी सुरू आहे. मात्र मध्य रेल्वेचा वेग मंदावलाय. सायन ते माटुंगा दरम्यान ट्रॅकवर पाणी साठायला सुरुवात झालीय. सायन-दादर प्रवासासाठी २० मिनिटे लागत आहेत. पाऊस असाच सुरूच राहिल्यास ट्रॅक पाण्याखाली जाण्याची चिन्हं आहेत.