मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्याव्यात याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी पार पडली. पावसाळा आहे तिथे मान्सूननंतर निवडणूका घ्या. तर जिथे पाऊस कमी पडतो अशा मराठवाडा आणि विदर्भ येथे निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात असं कोर्टाने सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ऐन पावसाळ्यात होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड, ठाणे, नागपूर, सोलापूर, अकोला, नाशिक, अमरावती, उल्हासनगर अशा १४ महापालिका तर २५ जिल्हा परिषदा आणि दोन हजार ४४८ नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.


२०१९ ते २०२१ या तीन वर्षांत राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. तर नाशिक, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये कमी अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील सोलापूर, अकोला, अमरावती येथे निवडणूक होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


यावर्षी राज्यात १५ जूनपर्यंत मान्सून दाखल होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदाचा मान्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर १० ते १५ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात येईल. राज्यात ९ ते १७ जून तर जुलै-ऑगस्ट महिन्यात १२ ते ३५ दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे हा कालावधी सोडून उरलेल्या दिवसात निवडणूक घेण्याची चाचपणी निवडणूक आयोग करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.