मुंबई : अखेर जून महिन्याच्या अखेरीस पावसाने चांगलीच हजेरी लावली. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि पालघर परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना होती. आज मुंबईकर चांगलेच गारठून गेले आहेत. सकाळी नवी मुंबई आणि ठाणे, कल्याण परिसरात पाऊस पडत होता. मात्र, मुंबईत रिमरिझ होती. मात्र, नऊ वाजल्यानंतर पावसाला चांगली सुरुवात झाली. हा पाऊस अजूनही बरसत आहे. या पावसाचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवर दिसत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू होती.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेधशाळेकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, पाऊस हुलकावणी देत होता. अखेर आज या पावसाला मुहूर्त मिळाला. मुंबई आणि उपनगरात चांगला पाऊस पडत आहे. तसेच कोकणातही चांगला पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. 



मुंबईतही पश्चिम उपनगरांमध्येही पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला २० दिवस पाणी पुरेल एवढाच साठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता होती. मात्र, पावसाला सुरुवात झाल्याने थोडासा दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी पहाटेपासून मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, कोकण याभागांमध्ये पावसाने जोर धरला आहे. मुंबई आणि ठाण्यात चांगला पाऊस पडत आहे. पश्चिम उपनगरातील अंधेरी, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, बोरिवली तर पूर्व उपनगरातील मुलुंड, घाटकोपर, विक्रोळी या भागात पावसाने चांगली हजेरी लावली. 



दरम्यान, कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरीत तर काही सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच रत्नागिरीतील पाणीप्रश्न सुटण्यास या पावसामुळे मदत झाली आहे. रत्नागिरीत एकदिवसा आड पाणीपुरवठा करण्यात येत होता.