मुंबईसह कोकणात पुढील २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी गेले दोन दिवस चांगला पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर आला आहे. तर काही जिल्ह्यात जोरदार सरी कोसळत आहेत. तसेच मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. ढगही दाटून आलेत. पुढच्या २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
४४ वर्षातला ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस
मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कालपासून कोसळत असलेल्या पावसाने अद्याप कुठेही पाणी साचलेले नाही. गेल्या २४ तासांत कुलाब्यात १०८ मिमी आणि सांताक्रुझ परिसरात ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासून संततधार पाऊस सुरु आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. कल्याण-डोंबिवलीत परिसरात सकाळपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. ठाणे, नवी मुंबई या ठिकाणीही जोरदार पाऊस कोसळत आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.
भंडारा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे, कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस येत असल्याने जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत, या पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीला पूर आल्याने मध्यप्रदेशला जोडणारा तुमसर बालाघाट महामार्गावर नदीवर चार फूट पाणी असल्याने मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.