मोदींची `राज`की बात व्हायरल
...आणि राज ठाकरेंचं ते भाकित खरं ठरलं?
मुंबई : येत्या रविवारी सोशल मीडिया सोडण्याचा विचार आहे अस ट्विट पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन केलं. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेलं व्यंगचित्र व्हायरल होत आहे. या व्यंगचित्रात त्यांनी, ज्या सोशल मीडियावर मोदी मोठे झाले तोच त्यांच्यावर उलटणार ठरणार असल्याचं भाष्य केल होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी त्यांच्या ट्विटवर ते सोशल मीडिया सोडण्याच्या विचारात असल्याचं ट्विट केलं. या ट्विटमधून कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही. पण त्यांच्या ट्विटवरुन मोदी सोशल मीडियाला रामराम करण्याची शक्यता आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूब या सर्व अकाऊंट्समधून बाहेर पडण्याबाबत त्यांनी म्हटलंय. येत्या रविवारी ते याबाबत आपली भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
मोदींच्या या ट्विटनंतर राज ठाकरेंचं दोन वर्षांपूर्वीचं व्यंगचित्र व्हायरल होतंय. या व्यंगचित्रात परतीचा पाऊस असं लिहिण्यात आलं असून नरेंद्र मोदी, अमित शाह, जेटली यांच्यावर सोशल मीडियाचा पाऊस पडत असल्याचं दाखवण्यात आलंय.
राज ठाकरेंनी दोन वर्षांपूर्वी एका फेसबुक पोस्टमध्ये भाजपने खोटी माहिती पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला असून आता त्यांच्यावर ते बुमरँग होत झालं, अशा आशयाची एक पोस्ट लिहिली होती. आता मोदींच्या सोशल मीडिया बाबतच्या या ट्विटनंतर रोज ठाकरेंच्या पोस्टची, व्यंगचित्राची चर्चा आहे.