मुंबई : काही दिवसांपूर्वी नांदेडचे मनसे शहराध्यक्ष सुनिल ईरावार यांनी आत्महत्या केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चिठ्ठी लिहत त्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र केला. या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी पत्र लिहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच सुनिल ईरावरच्या घरी फोन करुन घरच्यांचे सांत्वन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुनिल ईरावरच्या घरी फोन करुन विचारपूस केली. सुनिलने असं का केलं ? याची विचारणा केली. सुनिलचं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तुम्हाला भेटल्यानंतर तो खूप आनंदी झाला होता असे त्यांच्या भावाने सांगितले. सुनिलच्या पाठीमागे कोणकोण आहे ? असे देखील राज ठाकरेंनी विचारले. सुनिल मिळून चार भाऊ राहत असून ते एकत्र कुटुंबात राहतात.


सुनिल ईरावर यांचा साखरपुडा झाला होता. त्यांचं राज ठाकरेंवर खूप प्रेम होतं अशी माहिती त्यांच्या भावाने दिली. 


कोरोना संकटातून बाहेर आल्यानंतर मी घरी येऊन भेट देऊन जाईन असे देखील राज ठाकरे सुनिल यांच्या भावाला म्हणाला.  



राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी पत्र लिहिलं आहे.


राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं की, संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.'


'अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच ९ मार्च २००६ ला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही.'


'मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल.' असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


राज ठाकरे यांनी सुनील ईरावर यांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यकर्त्यांना विनंती केली की, 'माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका.'