दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : मनसेत सध्या शांतता आहे पण ही शांतता वादळापूर्वीची आहे. मनसेच्या भूगर्भात बरीच खदखद सुरू आहे आणि लवकरच भूकंप होण्याची चिन्हं दिसत आहेत. पक्षाच्या नेत्यांना ठाकरे स्टाईल दणके द्यायला सुरुवात झालीय. पदाधिका-यांची संस्थानं पद्धतशीरपणे खालसा केली जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्याचं मूळ दडलंय 20 एप्रिलला झालेल्या पक्षाच्या चिंतन बैठकीत. महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर झालेल्या या बैठकीत नेते, पदाधिकारी आणि नेतृत्व यांच्यामध्ये प्रचंड घमासान झालं. धोरणांमध्ये नेतृत्व कसं चुकलं, याचे नेत्यांनी दिलेले दाखले राज ठाकरेंनी बरोब्बर लक्षात ठेवले.


पहिला दणका बसला तो बाळा नांदगावकरांना. पक्षाच्या पराभवानंतर नांदगावकरांनी लोकसभा मतदारसंघ निहाय आयोजित केलेल्या बैठका राज ठाकरेंनी रद्द केल्या. उलट स्वतः विभागनिहाय बैठका सुरू केल्या.


मनसेच्या नेत्यांना जाणूनबुजून या बैठकांपासून दूर ठेवण्यात आलं. राज ठाकरेंनी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी संवाद सुरू केला. गटातटाच्या राजकारणाला कार्यकर्ते कंटाळलेत. हे कळताच शिवडीतल्या आणि भायखळ्यातल्या कार्यकारिणी राज ठाकरेंनी बरखास्त केल्या. नांदगावकर समर्थक पदाधिका-यांचा पत्ता कट करत नव्या नियुक्त्या करण्यात आल्या.


दुसरा दणका बसला तो मनसेत स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या शिशीर शिंदेंना. राज ठाकरेंच्या वाढदिवशी शिंदे अभिष्टचिंतन करायला आले. राज ठाकरेंना शुभेच्छा देतानाही पक्षाकडे लक्ष द्या, म्हणत शिंदेंनी नाराजीचा सूर लावला होता. भांडुप, मुलुंडमध्ये राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेतल्या. त्यानंतर शिंदेंना बोलावणं धाडलं आणि तुमच्याचविरोधात कशा तक्रारी आहेत, याचा पाढा शिंदेंना वाचून दाखवण्यात आला.


भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे मेहुणे आणि पक्षाचे उपाध्यक्ष संदीप दळवींनाही नेतृत्वानं दणका दिला. दळवी समर्थक पदाधिका-यांना डच्चू देण्यात आलाय.


पुढच्या काळात आणखीही नेत्यांची संस्थानं खालसा होणार आहेत. राज ठाकरेंना नव्या दमाची नवी टीम उभारायची आहे. त्यामुळे नेते प्रचंड अस्वस्थ आहेत. मनसेमधली ही अस्वस्थता पक्षाला नक्की कुठे घेऊन जाणार, याचं भाकीत सध्या तरी करणं कठीण आहे.