`आणीबाणी`वरुन राज ठाकरेंचे फटकारे, लोकां सांगे...!
राज ठाकरे यांचे नवे व्यंगचित्र हे `आणीबाणी`वर रेखाटले. मात्र, देशातील सद्य स्थितीवर जोरदार प्रहार करण्यात आलाय. लोकां सांगे.... असे म्हणत मोदींना जोरदार चिमटा काढला.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मुंबई दौऱ्यात 'आणीबाणी'वरुन काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सत्ताकाळात काय काय केलेय. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोट ठेवलेय. दुसऱ्याकडे बोट दाखविताना तुम्ही काय करत आहात, असा थेट सवाल व्यंगचित्रातून उपस्थित केलाय. देशातील सद्य स्थितीवर या व्यंगचित्रातून जोरदार प्रहार करण्यात आलाय. लोकां सांगे.... असे म्हणत मोदींना जोरदार चिमटा काढला.
मोदी यांनी आज मुंबईत आणीबाणीवरून काँग्रेस आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. ही टीका करताना आपण काय करत आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून चिमटे काढताना विचारलाय. राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रामध्ये नरेंद्र मोदी हे देशातील न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, उद्योगपती, प्रसारमाध्यमे यांची गळचेपी करत आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न केलाय.
लोका सांगे...! असे शीर्षक देऊन काढलेल्या या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, उद्योगपती, प्रसारमाध्यमे यांच्यावर पाय देऊन उभे असल्याचे दर्शवले आहे. तसेच या सर्वांची गळचेपी केल्यानंतर मात्र हे मोदी इंदिरा गांधी या हिटलर वृत्तीच्या होत्या. त्यांनी देशात आणीबाणी लादली. विचार आणि वाणीस्वातंत्र्याच्या मुसक्या आवळल्या. आणीबाणी ही एक भयानक गोष्ट आहे, असे मोदी सांगत आहेत. मात्र, स्वत: एकाधिकारशाहीने धोरणे राबवणाऱ्या मोदींच्या उक्ती आणि कृतीमधील फरक राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रामधून मांडण्याचा प्रयत्न केलाय.