जरांगेंच्या पाठीशी कोण? मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही, राज ठाकरेंचा दावा
Raj Thackeray : मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे , मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे. 25 डिसेंबरला जरांगे सांताक्लॉज बनून येणार का असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
Raj Thackeray on Maratha Reservation : मराठा समाजाला कधीही आरक्षण मिळणार नाही, हे त्यांना त्यांच्या समोर सांगून आलो होतो, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) स्वत: बोलतायत की त्यांचा बोलावता धनी कोण वेगळा आहे, यातून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण निवडणूका तोंडावर असताना या सर्व गोष्टी होतायत हे काय सरळ चित्र दिसत नाही, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलेयत. जरांगेंच्या मागे कोण आहे, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. तर आमच्या मागे कोण आहे, हे शोधून काढा, असं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलंय.
काय म्हणाले राज ठाकरे
निवडणुकीच्या तोंडावर या सर्व गोष्टी घडवल्या जात आहेत, हे इतकं सरळ चित्र नाहीए, या मागे कोण आहे हे कळेलच, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलंय. लोकांचं लक्ष विचिलत करण्यासाठी असले मुद्दे बाहेर काढले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी योग्य भूमिका घ्यायला हवी, राजकीय पक्षांना, नेत्यांना मतदारांची भीती वाटली पाहिजे, नुसतं सुशिक्षित असून चालणार नाही तर सुज्ञ व्हावं लागेल, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलंय.
मनोज जरांगेंचा इशारा
सरकारने 24 डिसेंबरला आरक्षण देण्यासाठी सरकारने दोन दिवसात टाईम बॉण्ड द्यावा...आरक्षण मिळालं नाही तर 24 डिसेंबरनंतर मुंबईत धडकू असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय...तसंच सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी खंडेरायाकडे साकडं घालणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे...मनोज जरांगेंची पहिली सभा ही पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यतील वरवंड इथं होणारंय..त्यानंतर जेजुरीत जाऊन खंडोबाचं दर्शन घेतील..यानंतर साता-यातील खटावमध्ये त्यांची दुसरी सभा होणारंय.
करमाळा तालुक्यातील वांगी इथली जरांगेंची सभा पहाटे पार पडली.. रात्री 7 वाजता ही सभा होणार होती. मात्र जरांगेंना पोहोचण्यास उशीर झाल्यानं पहाटे पावणेचार वाजता ही सभा झाली.. या सभेसाठी मराठा बांधव तब्बल 9 तासांपासून बसून होते.. कडाक्याच्या थंडीमुळे जरांगेंनी फक्त साडेचार मिनिटंच मराठा बांधवांना संबोधित केलं.
दरम्यान, मनोज जरांगेंच्या साता-यातील सभेला मराठा समन्वयकांनी विरोध केलाय. 18 नोव्हेंबरला साताऱ्यातील पोवई नाक्यावर शिवतीर्थ परिसरात जरांगेंची सभा होणार आहे. ही सभा होऊ देणार नाही अन्यथा गंभीर परिणामांना समोरं जावं लागेल असा इशारा समन्वयक तेजस्वी चव्हाणांनी दिलाय.