COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : राज्यातल्या प्लास्टिक बंदीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली आहे. प्लास्टिक कंपन्यांकडून निवडणूक फंड वसूल करण्याची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसंच काही काळानंतर सगळं सुरळीत होईल, असं राज ठाकरे म्हणाले. प्लास्टिक बंदी करण्याची काय घाई होती? देशात प्लास्टिक बंदी नाही मग महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी का आहे, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. व्यापारी किंवा सामान्य माणसांवर तुम्ही पाच हजार रुपयांचा दंड लावता, अचानक काय झालं, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच प्लास्टिक बंदीवर मुख्यमंत्री गप्प का आहेत? हा राज्य सरकारचा निर्णय आहे का खात्याचा आहे, असंही राज ठाकरेंनी विचारलं.  महापालिकांनी त्यांची जबाबदारी जनतेवर ढकलल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.


प्लास्टिक बंदी करण्याची घाई का केली? बंदीपूर्वी पुरेशी जनजागृती का केली नाही? स्वच्छतेसाठी महापालिकेनं काय केलं? अनधिकृत झोपडपट्ट्यांना कोणता दंड घेता? असे सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले. याचबरोबर वेफर्सच्या पाकिटांना मुभा आहे त्यामुळे अनेक प्रश्न पडतात. प्लास्टिक बंदीवर सरकारनं पर्याय दिला नाही. महापालिकांनी कचरा कुंड्याही उभ्या केल्या नाहीत. सरकार आणि महापालिकांनी त्यांची कामं नीट करावी. सुविधा मिळत नाही तोपर्यंत दंड घेऊ नका, असं राज ठाकरे म्हणाले.