मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पेजवरून बऱ्याच दिवसांनी संवाद साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आपले फेसबुक पेज सुरू करून अनेक दिवस झाले. या पेजवरून त्यांनी काही व्यंगचित्र आणि काही पत्रे शेअर केली होती. मात्र बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर त्यांनी एक निवेदन शेअर केले आहे.


या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बरेच दिवस आपली भेट नाही, व्यंगचित्रांतून पण आपल्याशी बोलणं झालं नाही. गेल्या वीस दिवसांत इतकं काही घडलंय की व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) जरा जास्तच वाढलाय हे मलाही मान्य आहे. पण कोणत्याही सत्ताधाऱ्यांसारखा अनुशेष तसाच ठेवणाऱ्यातला मी नाही. हा सर्व बॅकलॉग भरून काढणार आहे. आणि व्यंगचित्रांची मालिका लवकरच सुरू करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितले आहे. 



राज ठाकरे यांनी 21 सप्टेंबर 2017 रोजी आपले ऑफिशिअल फेसबुक पेज सुरू केले. या फेसबुक पेजवरून राज ठाकरे प्रत्येकाशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. तसेच त्यांनी आपली व्यंगचित्र या पेजवरून शेअर करून साऱ्यांचा समाचार घेतला होता. आता लवकरच अशी मालिका सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.