Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : राज्याचं राजकारण दोन ठाकरेंशिवाय कधी पूर्णच होत नाही. सध्या हे दोन ठाकरे पुन्हा चर्चेत आलेत ते एका लग्नानिमित्तानं.. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट नेमकी कुठं झाली.. ही चर्चा कुठवर पोहोचली.. पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तमाम शिवसैनिक आणि मनसैनिकांचं स्वप्न आज एक दिवसासाठी का होईना सत्यात उतरलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकमेकांसमोर उभे ठाकले.. दोघेही कोणताही राजकीय आडपडदा न ठेवता भावाभावांसारखे जिव्हाळ्याने वागले. ठाकरे बंधुंनी आपुलकीनं एकमेकांशी आणि कुटुंबियांशीही जिव्हाळ्याचा संवाद करत होते. निमित्त होतं ते राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नाचं.. मुंबईतल्या दादरच्या शिवाजी विद्यालयात हा लग्नसोहळा पार पडला. त्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. यानंतर राज आणि उद्धव ठाकरे राजकीय पटलावरही एकत्र येणार का याच्या चर्चा सुरु झाल्यात. 


ज्या महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे त्याचा घटकपक्ष काँग्रेसनंही या भेटीपेक्षा जनतेचे प्रश्न जास्त महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय. शिवसेना आणि काँग्रेस पक्षासाठी ठाकरे भेटीचा मुद्दा महत्त्वाचा नसला तरी तो राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. कारण एकीकडे पक्षफुटीमुळे शिवसेना उबाठाची ताकद निम्मी झालीय. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसे या दोघांचं पानिपत झालंय.


अशात आगामी मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकांमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंची एकजूट झाली. तर मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरील मतांना आपल्याकडे खेचण्यात दोन्ही ठाकरे यशस्वी ठरु शकतात.. त्यामुळं राज्यात कमकुवत होत चाललेल्या प्रादेशिक पक्षांना एक दिशा मिळू शकते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याने भाजपला थेट फटका बसू शकतो.. त्यामुळं सध्या लग्नात एकत्र दिसलेले ठाकरे बंधू भविष्यात राजकीय व्यासपीठावर हातात हात घेऊन उभे राहतात का याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष असेल.