राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर मनसे नेत्याच्या हत्येचा आरोप, राज ठाकरे पवारांना भेटणार
काय कारवाई करतात बघतो... राज ठाकरेंचा राज्य सरकारला दिला इशारा
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी मनसेचे पदाधिकारी जमीर शेख यांची हत्या झाली होती. यावर राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात ठाण्यातील नगरसेवक नजीब मुल्ला यांचं नाव पुढे आलं आहे. नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोकच दिवसाढवळ्या लोकांना मारत असतील तर हे बरोबर नाही. या प्रकरणात सरकार काय करतं ते पाहणार आहे. नाही तर दुसऱ्यांचेही हात बांधलेले नाहीत. अशा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
खुनाला उत्तर खुनाने देणं हे चित्रं महाराष्ट्रासाठी योग्य नाही. या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून नजीब मुल्लावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन तपास केला आणि आरोपींना अटक केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी हे कबुल केल्याचं देखील समोर आलं आहे.
याआधी नजीम मुल्ला यांचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात देखील चर्चेत आलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्यांचं नाव पुढे आल्याने राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय, असा इशारा राज ठाकरेंनी यांनी दिला आहे.