मुंबई : बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी काढलेल्या मोर्चाद्वारे मनसेनं शक्तिप्रदर्शन तर केलंच, पण या निमित्तानं कात टाकून मनसे भगवीही झाली. काही वर्षांपूर्वी मराठीच्या मुद्यावर रान उठवणाऱ्या मनसेनं आता हिंदुत्वाच्या मुद्यावर नव्यानं राजकीय सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंची मनसे आता भगव्या रंगात रंगली आहे. मुंबईतील मोर्चासाठी हजारो मनसैनिक रस्त्यावर उतरले. तेव्हा त्यांच्या डोक्यावर भगव्या टोप्या आणि हातात राजमुद्रा असलेले भगवे झेंडे होते. या नव्या वेशात आणि रंगात मनसैनिकांचा उत्साहही ओसंडून वाहत होता. 


राज ठाकरेंनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा भगवा, हिरवा, निळा आणि पांढरा असा बहुरंगी झेंडा घेऊन सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला. पण देशात सीएए, एनआरसी, एनपीआरमुळे वातावरण तापलं असताना आणि शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केलं असताना मनसेनं नवा झेंडा आणि मुद्यासह ट्रक बदलला आणि भगव्याची अर्थात हिंदुत्वाची कास धरली आहे. 


भाजप आणि शिवसेनेच्या भगव्या हिंदुत्वाला आता मनसेच्या राजमुद्राधारित भगव्याचं आव्हान असणार आहे. शिवसेनेचा भगवा भाजपपासून दूर गेलाय. त्यामुळे मनसेचा भगवा आता भाजपच्या जवळ जाऊन नवी राजकीय समीकरणं साधणार का याची उत्सुकता आहे.