मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर रेल्वे प्रशासन कामाला लागल्याचे दिसत आहे. मनसेच्या कडक इशाऱ्यानंतर प्रमुख रेल्वे स्थानकांवरील फेरीवाले गायब होताना दिसत आहेत. रेल्वेने नोटीस काढून स्थानके फेरीमुक्त करण्याचे आदेश दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलफिन्स्टन रोड स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन २३ जणांना बळी गेला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेने संताप मोर्चा काढला होता. यावेळी राज ठाकरे यांनी इशारा दिला होता. रेल्वे स्थानकांवरील फेरीवाले येत्या १५ दिवसांत हटवा, अन्यथा १६व्या दिवशी आम्ही त्यांना हटवू, असा इशारा  राज यांनी दिला होता. २४ तास उलटत नाहीत तोच महामुंबईतील रेल्वे स्थानके फेरीवालेमुक्त होण्यास सुरुवात झाली आहे.


कधी नव्हे ते पहिल्यांदाच दादर, अंधेरी आणि ठाणे ही अत्यंत गर्दीची रेल्वे स्थानके वेगळी भासत आहेत. येथे फेरीवाले दिसत नव्हते. त्यामुळे सहज चालता येत होते. चाकरमानी आज कामावरून परतले तेव्हा 'मोकळी' झालेली रेल्वे स्थानके आणि फेरीवालेमुक्त रेल्वे ब्रिज पाहून त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. माझ्या वैयक्तिक परिचयातील अनेकांनी तर मला फोन करून राज यांचे आणि मनसेचे आभार मानले, अशी माहिती मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी फेसबूक वॉलवर पोस्ट केलेय.