मुंबई : काही झाले तर कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. सरकारला काय करायचं आहे ते सरकारने करून घ्यावं. पण, हा प्रकल्प कोकणात होणार नाही, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला. तसेच, भाजप सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. मनसेच्या वतीने महिलांना १०० रिक्षांचे वापट करण्यात आले. या वेळी जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते. या वेळी बोलतना त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे वाभाडे काढले. तसेच, आपल्या खास शैलीत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेचा भडीमार केला.


'राहुल गांधींना पप्पू म्हणणाऱ्यांची तोंडे बंद झाली'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींना सत्तेत येऊन साडेचार वर्षे होत आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवले. डॉ. आंबेडकरांमुळे आपण पंतप्रधान झाल्याचे ते सांगतात. पण, हेच त्यांना ज्या वेळी ते सत्तेत आले तेव्हा का नाही आठवले. त्याच वेळी त्यांनी 'मी नरेंद्र दामोदारदास मोदी शपथ घेतो की, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे...' असे का नाही म्हटले. बलात्काराच्या घटनेत भाजपचेच लोक पाठींबा देतात तेव्हा तीव्र संताप येतो. पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी हा माणून असा आहे हे माहिती नव्हते, असा घणाघात करतानाच गुजरात निवडणुकीनंतर राहुल गांधींना पप्पू म्हणणारांची तोंडे बंद झाल्याचेही राज ठाकरे म्हणाले. बहुदा, पप्पूच्या ऐवज परम पूज्य झाले असावे असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.


'मुख्यमंत्री खोटं बोलतात'


दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री चक्क खोटं बोलतात. ते आमच्या सरकारने राज्यात शेकडो विहिरी बांधल्याचे सांगतात. जे वास्तवात घडले नाही. येत्या काळात राज्याचे वाळवंटीकरण होण्याची शक्यता आहे. पण, आम्ही विहिरी बांधल्याचे मुख्यमंत्री खोट सांगतात. तसेच, मुख्यमंत्र्यांचे गुजरात राज्यावर जास्तच प्रेम आहे. ते म्हणतात महाराष्ट्रात नाणार प्रकल्प झाला नाही तर, तो गुजरातमध्ये जाईल. का? इतर राज्ये मेली की काय? गुजरातच का? गोवा किंवा देशातील इतर राज्ये का नाहीत, असा सवालही ठाकरे यांनी या वेळी विचारला.