दीपक भातुसे/अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात शिकण्यासाठी मिळाल्याची गोष्ट समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुसूचित जातीच्या मुलामुलींना शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागाने तयार केली आहे. गेली अनेक वर्षे गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे. मात्र याच खात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोले हिला अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रॉफीजिक्स या विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी इंग्लंडमधील मचेस्टर विद्यापीठमध्ये 3 वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे.


मंत्री असतांना, आर्थिक स्थिती चांगली असतांना स्वतःच्याच खात्यामधील सुविधेचा कसा गैरफायदा घेतला जातो हे या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. यामुळे ख-या गरजू विद्यार्थ्यांना संधी मिळत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.


दरम्यान आपल्या मुलीला नियमानुसार शिष्यवृत्ती मिळाल्याला दावा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलाय.


राजकुमार बडोलेंच्या मुलीप्रमाणेच सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि उच्च तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव दयानंद मेश्राम यांच्या मुलांनाही परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाल्याचं समोर आलंय. अंतरिक्ष दिनेश वाघमारे याला अमेरिकेत दोन वर्षांच्या मास्टर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळालीये. तर समीर मेश्रामलाही परदेशात शिष्यवृत्ती मिळालीये.


कोणाला मिळते परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती?


विद्यार्थ्यांच्या पालकाचं वार्षिक उत्पन्न सहा लाखाच्या आत असावं तसंच जागतिक क्रमवारीत पहिल्या 100 मध्ये असणाऱ्या परदेशी विद्यापीठांमध्ये तसंच लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा लागू नाही.