मुंबई: येत्या २६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून महाविकासआघाडीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी ही निवडणूक होत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असल्याने यापैकी चार जागांवर महाविकासआघाडीचे उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, तीन पक्षांमध्ये चार जागांचे वाटप कसे करायचे, यावरून वाद निर्माण झाला आहे. चौथी जागा लढवण्यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार शिवसेना हा महाविकासआघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी परस्पर शरद पवार आणि फौजिया खान यांची नावे निश्चित करून दोन जागा आपल्याकडे घेतल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचे समजते. याबाबत तिन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. चौथ्या जागेचा निर्णय हा समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात यावा, असा काँग्रेसचा आग्रह आहे. काँग्रेसने फौजिया खान यांच्या जागेवर दावा सांगितला आहे.  उपमुख्यमंत्रिपद, महत्त्वाची खाती न मिळाल्यानं राज्यसभेची अतिरिक्त जागा मिळावी, अशी काँग्रेसची आग्रही मागणी आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस नमती भूमिका घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवण्याची भाजपची तयारी


महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. या सातही जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्यसभेची निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी प्रथमच एकत्र लढणार आहे. त्यामुळे पवार आणि खान यांचा राज्यसभा निवडणुकीतील विजय सोपा मानला जात आहे. तसेच फौजिया खान यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे.  


'फडणवीस दिल्लीला गेले तर मुनगंटीवारांना आनंद', अजितदादांची फटकेबाजी