सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात तब्बल १८ वर्षांनतर निवडणूक होत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकमेकांना बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी एकमेकांना प्रस्ताव दिले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, दोन्हीकडून एकमेकांचे प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने राज्यसभेच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने राजकीय डावपेच आणि प्रति डाव रंगणार आहेत. तसेच, राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात मोठा भूकंप होणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे. 


राज्यसभेचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून गेले काही दिवस महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चां रंगू लागल्या आहेत. राज्यसभेसाठी उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. हे मतदान खुल्या पद्धतीने होणार असलं तरी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात भविष्यातील नवी राजकीय समीकरणे या निवडणुकीच्या निमित्ताने मांडली जाणार आहेत.


राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, तसेच तिसरा उमेदवार म्हणून धनंजय ( मुन्ना ) महाडिक यांनी अर्ज दाखल केले आहेत.


शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी असे सात उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या आमदारांना मतदान खुल्या पद्धतीने दाखवून करायचे आहे.


पण, सर्वात महत्त्वाचा राजकीय डाव हे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार मांडणार आहेत. हे अपक्ष आमदार आणि छोटे पक्ष नेमकी काय भूमिका घेतात यावरच भाजपाचा तिसरा उमेदवार मुन्ना महाडिक किंवा शिवसेनेचे संजय पवार यांचे भवितव्य अवलंबून आहे.


शिवसेना की काँग्रेस नेमका धोका कुणाला ?


भाजपाने आखलेल्या डावपेचात शिवसेनेचे संजय पवार, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी यांचा बळी जाणार की भाजपची खेळी त्यांच्याच अंगलट येऊन मुन्ना महाडिक यांना धोबीपछाड मिळणार याचे उत्तर उद्या मिळणार आहे.       


काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशचे असून त्यांच्याविरोधात स्थानिक आमदारांमध्ये नाराजी आहे. त्याचा फायदा भाजप घेणार की शिवसेना असा प्रश्न आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला तर त्याचे महाविकास आघाडीवर त्याचा नेमका किती परिणाम होईल ते सांगता येणार नाही.


मात्र, काँग्रेसने दिल्लीतून दिलेल्या इम्रान प्रतापगडी यांचा पराभव झाला तर मात्र महाविकास आघाडीत भूकंप माजेल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे प्रियांका गांधी यांचे इम्रान प्रतापगडी अतिशय निकटवर्तीय आहेत. काँग्रेस हायकमांडने दिलेला त्यांच्या अगदी जवळचा उमेदवार पडला जात असेल तर भविष्यात महाविकास आघाडी धोक्यात येऊ शकते. 


काँग्रेस याबाबत काही मोठा निर्णय घेऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे भाजपदेखील मोठ्या राजकीय भूकंप घडवण्याच्या दृष्टीनेच काही घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.