मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे प्रत्येकी १ असे सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आज सकाळपासून महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि भाजप यांनी प्रयत्न केले. मात्र ही चर्चा फिस्कटल्याने राज्यसभेची निवडणूक अटळ झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होणार हे निश्चित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अमरावतीचे अनिल बोन्डे आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक तर शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार यांना संधी दिलीय. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली आहे.


राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ४२ मतांची गरज आहे. त्यानुसार भाजपचे दोन, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपने आणखी एक उमदेवार दिल्यामुळे आता भाजपचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात थेट लढत होईल.


अशी आहे निवडणूक प्रक्रिया


राज्यसभा निवडणुकीसाठी कोटा निश्चित करताना विधानसभेतील सदस्यांची संख्या महत्त्वाची असते. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 सदस्य आहेत. त्यातील एक जागा रिक्त आहे. विजयासाठीचा कोटा निश्चित करताना विधानसभा सदस्यांची संख्या भागिले निवडून द्यावयाच्या जागा अधिक एक असे गणित केले जाते.


म्हणजेच २८७ भागिले (६+१) बरोबर ४१ आणि त्यात १ जोडला जातो. अशाप्रकारे कोटा ४२ असा होतो. पहिल्या पसंतीची ४२ मते मिळालेला उमेदवार विजयी होतो. या निवडणुकीत प्रत्येक आमदार प्राधान्याने मतदान करतो. यामध्ये आमदारांना कागदावर लिहून सांगावे लागते की त्यांची पहिली पसंती कोण आणि दुसरी कोण. 


विशेष म्हणजे या निवडणुकीत उघड पद्धतीने (ओपन बॅलेट) मतदान होते. पक्षाने व्हीप बजावला असेल तर त्या त्या पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीला मतदान कोणाला केले हे दाखवावे लागते. त्या त्या पक्षाचा प्रतोद हाच शक्यतो निवडणूक प्रतिनिधी असतो.