Rajyasabha Election : राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं निवडणुकीची मतमोजणी रखडली आहे. मतदानाच्या वेळी जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी मतपत्रिका दाखवल्यानं त्यांची मतं बाद करावीत, अशी मागणी भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांची मतं बाद ठरवावीत, अशी मागणी करणारं पत्र महाविकास आघाडीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतं, याकडं लक्ष लागलंय. त्यानंतरच प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे


महाविकास आघाडीने घेतला आक्षेप
भाजपच्या रवी राणा आणि सुधीर मुंनगटीवार यांच्यावर महाविकास आघाडीनं आक्षेप घेतलाय. मविआनं तसं पत्रही निवडणूक आयोगाला लिहिलंय. रवी राणा मतदानावेळी हनुमान चालिसा घेऊन आले होते. तर सुधीर मुनगंटीवारांनी आपली मतपत्रिका चंद्रशेखर बावनकुळेंच्या हातात दिल्याचा आक्षेप घेण्यात आलाय. काँग्रेस पोलिंग एजंट अमर राजूरकर यांनी हा आक्षेप नोंदवलाय. तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. 


भाजपचा तीन मतांवर आक्षेप
भाजपने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचे मत बाद ठरवण्याची मागणी केली आहे. राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक होतं. 


पण जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. त्यामुळे या दोन्ही आमदारांची मतं बाद ठरवण्यात यावीत, अशी मागणी पराग अळवणी यांनी केली होती.


आक्षेप नोंदवल्याने मतं बाद होणार?
दोन्ही पक्षांनी आक्षेप नोंदवल्याने कोणाची मते बाद होणार असा सवाल उपस्थित झाला आहे. जर मतं बाद झाली तर ती कोणती मते असणार हा सर्वात मोठा सवाल आहे.  मतदान करताना सर्वांनी मतपेटीत  मतपत्रिका टाकल्या आहेत त्यातून ही मते कोणती हे कसे ठरवणार ? पुन्हा निवडणूक होणार का ? असे सवालही उपस्थित झाले आहेत.


केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी रोखून ठेवली असून तपासासाठी मतदान केंद्रावरील चित्रीकरण मागवले. चित्रीकरण तपासूनच केंद्रीय निवडणूक आयोग तीन मताबाबत निर्णय जाहीर करणार आहे.