मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून काही उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये रजनी पाटील, मुकुल वासनिक आणि राजीव सातव यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, काँग्रेसच्या वाट्याला राज्यसभेची अवघी एकच जागा येणार असल्याने या तिघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे. ९ मार्चला बाळासाहेब थोरात दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. यावेळी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार शिवसेना हा महाविकासआघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी परस्पर शरद पवार आणि फौजिया खान यांची नावे निश्चित करून दोन जागा आपल्याकडे घेतल्या होत्या. यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाला होता. उपमुख्यमंत्रिपद, महत्त्वाची खाती न मिळाल्याने राज्यसभेची अतिरिक्त जागा मिळावी, अशी काँग्रेसची आग्रही मागणी होती.


नाथाभाऊंना राज्यसभेची ऑफर; राज्यसभेसाठी भाजपचे उमेदवार निश्चित?


मात्र, येत्या ११ तारखेला शरद पवार आणि फौजिया खान मुंबई विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला एकच जागा येणार, असेच चित्र आहे. शिवसेनेने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. 


तर भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनपेक्षितपणे एकनाथ खडसे यांचे नाव पुढे येताना दिसत आहे. भाजपश्रेष्ठींनी राज्यसभेसाठी एकनाथ खडसे, उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.