मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस असून तीन वाजेपर्यतची मुदत आहे. या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने या निवडणुकीत तीन उमेदवार देऊन चुरस निर्माण केली होती. तर, शिवसेनेने दोन उमेदवार दिले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संख्याबळानुसार त्यांचे प्रत्येकी एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे.


मात्र, निवडणूक झाल्यास त्यात घोडेबाजार होण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तिसरा उमेदवार मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर भाजपने विधान परिषदेची एक जागा देऊन त्याबदल्यात राज्यसभेची एक जागा देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला.


त्यानंतर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसाठी शिवसेनेने नवा प्रस्ताव ठेवल्याची माहिती हाती आली आहे. शिवसेनेने राज्यसभेची दुसरी उमेदवारी मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्या बदल्यात शिवसेना विधान परिषदेच्या तीन जागा लढवणार आहे.


काँग्रेसच्या कोट्यातील विधान परिषदेची जागा निवडून येण्यास मोठी अडचण आहे. त्यामुळे शिवसेना विधान परिषदेच्या तीन जागांचा विचार करत आहे. शिवसेनेच्या या नव्या प्रस्तावावर शिवसेना नेते संजय राऊत दिल्लीतील काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.


शिवसेनेचा हा प्रस्ताव मान्य झाल्यास राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांना विधान परिषदेवर पाठविण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.