मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी काँग्रेसने रजनी पाटील तर भाजपकडून संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल आहे.  पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.


भाजपला केली विनंती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही केलीय...आम्हांला खात्रीय की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, असं या भेटीनंतर नाना पटोले यांनी म्हटलं आहे. संघटनेत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं फडणवीस यांनी सांगितल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.


फडणवीस यांनी ठेवला प्रस्ताव?


पक्षात कुठलाही निर्णय आपण एकटे करत नाही, पक्षाच्या कोअर कमिटीशी चर्चा करुन त्या आधारावर निर्णय होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात भाजपच्या निलंबित 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवलाय अशी माहिती सूत्रांनी दिलीय आहे. 


शिवसेना - राष्ट्रवादी नाराज


दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसला महाविकास आघाडी सरकारवर विश्वास नाही का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


फक्त राज्यसभा निवडणुकीवर चर्चा


महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजीची चर्चा रंगल्यानंतर आम्ही फक्त राज्यसभा निवडणुकीवर चर्चा केली, याशिवाय कोणतीही चर्चा झाली नाही असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं थोरात यांनी स्पष्ट केलं. तसंच काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल अशी आपल्याला खात्री असून राज्यात जी परंपरा आहे ती कायम राहावी यासाठी आम्ही भेट घेतल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.