राज्यसभा निवडणूक : ...म्हणून राष्ट्रवादीने दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरला नाही
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पण महाविकासआघाडीमध्ये अजून चौथ्या जागेचा तिढा सुटलेला नाही. राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान आज उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी सांगण्यात येत होतं. पण चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीकडून आज शरद पवारांचाच अर्ज भरण्यात आला.
महाविकासआघाडीत चौथ्या जागेविषयी असलेला तिढ्याबाबत समन्वय समितीमध्ये चर्चा होईल आणि मग निर्णय होईल, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर ७ उमेदवार जाणार आहेत, यासाठी २६ मार्चला निवडणूक होणार आहे.
विधानसभेतल्या सध्याच्या संख्याबळानुसार राज्यसभेवर ७ पैकी महाविकासआघाडीचे ४ तर भाजपचे ३ उमेदवार निवडून जाऊ शकतात. या ७ पेक्षा एखाद्या उमेदवाराने अर्ज भरला तर मात्र राज्यसभेसाठी निवडणूक होऊ शकते. जर सातच अर्ज दाखल झाले, तर मात्र राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल.
राज्यसभेच्या ७ जागांपैकी फक्त शरद पवारांचंच नाव अंतिम झालेलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपने मात्र त्यांच्या नावाची यादी अजून जाहीर केलेली नाही.