भाजप आमदार कदमांवर गुन्हा दाखल करा - चित्रा वाघ
राम कदम ही समाजात लागली ही विकृती आहे. ही विकृती ठेचून काढली पाहिजे. - चित्रा वाघ
मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी महिला आयोगाची बिनशर्त माफी मागितली आहे. दरम्यान, माफी मागून काहीही होणार आहे. राम कदम ही समाजात लागली ही विकृती आहे. ही विकृती ठेचून काढली पाहिजे. त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुन्हा केलेय. वाघ यांनी महिला आयोगाची आज भेट घेतली, त्यावेळी ही मागणी केली.
दहीहंडीच्या कार्यक्रमात राम कदम यांनी तरुणांना उद्देशून म्हटले होते की, तुम्हाला एखादी मुलगी आवडली तर माझ्याकडे या. तुमच्या आई-वडिलांचाही याला होकार असेल तर, मी तुमच्यासाठी तिला पळवून आणेन. राम कदम यांच्या वक्तव्यानंतर समाजातून टीकेची मोठी झोड उठली होती.
या पार्श्वभूमीवर महिला आयोगाने ५ सप्टेंबर रोजी राम कदम यांना नोटीस पाठविली होती. यानुसार आमदार कदम यांनी आयोगाकडे लेखी खुलासा सादर केला असून आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांची बिनशर्त माफी मागितली आहे. तसेच भविष्यात महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहण्याची हमीही दिली आहे. आमदार कदम यांच्या या खुलाशावर कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करु, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी दिली.
दरम्यान, चित्रा वाघ यांच्या मागणीनंतर आम्ही याची दखल घेतली आहे. वकिलांकडे कायदेशीर सल्ला घेतला जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करु, असे आश्वासन महिला आयोगाने त्यांना यावेळी दिले. याबाबत राज्य महिला आयोग सदस्य वृंदा किर्तीकर यांनी स्पष्टीकरण देलेय, ही केस थांबवलेली नाही. आठ ते दहा दिवसात आम्हाला उत्तर मिळेल, त्यानंतर महिला आयोग पाऊल उचलेल.