मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. मात्र, यानंतर आदित्य ठाकरे यांनी देशातील रेल्वेसेवा सुरु न केल्याबद्दल केंद्र सरकारवर खापर फोडले होते. आदित्य ठाकरे हे अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जाऊन भूमिका घेऊच कसे शकतात, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जबाबदारी झटकून पळ काढू नका', वांद्रयातील गर्दीवरून फडणवीसांचं आदित्यना प्रत्युत्तर

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात मंगळवारी हजारो उत्तर भारतीय मजुरांनी ट्रेनने आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी केली होती. आम्हाला रेल्वेने आमच्या गावी जाऊन दिले जावे, अशी मागणी करत या मजुरांनी वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात ठिय्या मांडला होता. यावरून लॉकडाऊन असताना इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आलेच कसे, असा सवाल विचारत विरोधकांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या सगळ्याचे खापर केंद्र सरकारवर फोडले होते. 



केंद्र सरकारने कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे वांद्र्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरतमध्ये झालेली दंगलही याचाच परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा घर नकोय, त्यांना त्यांच्या घरी जायचे आहे, असे आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

याच मुद्द्यावरून रामदास आठवले यांनी आदित्य यांना लक्ष्य केले. मुळात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. मग आदित्य ठाकरे त्याच्याशी विसंगत भूमिका कशी काय घेतात? ट्रेन सुरु झाल्या असत्या तर कोरोनाचा प्रादुर्भाव देशभर वाढला असता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची भूमिकाच चुकीचीच असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.