KCR-Uddhav Thackeray भेटीवर रामदास आठवले म्हणतात... `काहीही फरक पडत नाही`
रामदास आठवले यांनी तिसऱ्या आघाडीचा एनडीएवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजपला एकत्र येण्याचं आवाहन यावेळी केलं आहे. (Ramdas Athawale on KCR-Uddhav thackeray meeting)
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शिष्टमंडळाच्या समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीये.
'तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर (CM KCR) महाराष्ट्रात येऊन आपले सीएम उद्धव ठाकरे यांना भेटले.त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली तरी एनडीएला काहीही फरक पडणार नाही, केंद्रात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एनडीएच सत्तेत येणार आहे.' असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.
आठवले म्हणाले की, 'केसीआर यांचं प्रभावक्षेत्र फक्त तेलंगणा पुरतंच मर्यादित आहे, तिसऱ्या आघाडीसाठी त्यांनी राजकीय पुढाकार घेतल्याने काहीही फरक पडणार नाही.'
सेना-भाजप आरोप प्रत्यारोप
ही राजकीय चिखलफेक दूर्दैवी असून ती थांबली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यात हस्तक्षेप करावा. सेना - भाजपने आपसातलं राजकीय वैर विसरून पुन्हा एकत्र यावं.
पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेवर राहणार नाही. असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.