शिवसेना दाऊदला घाबरते - रामदास आठवले
शिवसेनेची कार्यालयंदेखील अनधिकृत आहेत, मग त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल आठवलेंनी केला आहे.
मुंबई : कंगनाचं समर्थन करणारे रिपाईचे नेते आणि खासदार रामदास आठवले यांनीही आता शिवसेनेला शिंगावर घेतलंय. कंगनाचं कार्यालय पाडणं चुकीचं आहे. शिवसेनेची कार्यालयंदेखील अनधिकृत आहेत, मग त्यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल आठवलेंनी केला आहे. शिवसेना दाऊदला घाबरते, असा टोलाही आठवलेंनी लगावला आहे. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं खुली करावी या मागणीसाठी रामदास आठवले दादरच्या चैत्यभूमीवर आंदोलन केलं, यावेळी ते बोलत होते.
मुंबईतल्या पाली हिल परिसरातल्या कंगनाच्या ऑफिसवर महापालिकेनं हातोडा चालवला होता. त्या आफिसची कंगना रनौतनं पाहणी केली. या तोडलेल्या ऑफिसमध्ये जवळपास अर्धा तास होती. कंगनानं राहत्या घराचं अनधिकृतरीत्या ऑफिसमध्ये रुपांतर केलंय, त्यामुळं रहिवासी ठिकाणाचा व्यावसायिक वापर केल्यानं मुंबई महापालिकेनं या ऑफिसचा अनधिकृत भाग पाडला. याविरोधात कंगनानं हायकोर्टात धाव घेतली आहे.
कोर्टानं परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असून कंगनाच्या याचिकेवर आता २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. अल्पावधीची नोटीस देत कारवाई करणं पक्षपाती आणि चुकीचं असल्याचा आरोप कंगनानं म्हंटलंय.
दरम्यान, कंगनाविरोधात शिवसेना आक्रमक झाली असताना, मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला.