`उद्धवजी भोळे, शरद पवारांनी शेवटी डाव साधला` रामदास कदम यांचा गंभीर आरोप
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना... रामदास कदम यांनी व्यक्त केली खंत
Ramdas Kadam Live : ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम (Ra यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनी झी 24 तासशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रामदास कदम यांनी थेट शरद पवार आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले.
पवारांमुळेच शिवसेना फुटल्याचा गंभीर आरोप रामदास कदम यांनी झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत केलाय. बाळासाहेबांच्या हयातीत जे पवारांना जमलं नाही त्यांनी ते आता साधल्याचा आरोपही त्यांनी केला. आपण मध्यस्थी करत होतो. मात्र पवार मातोश्रीवर आले आणि सर्व संपल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.
मी 52 वर्ष काम केलं
मी गेली स्वत: 52 वर्ष झोकून काम केलं, शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा द्यावा लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आमच्या आयुष्याची संध्याकाळ अशी होईल असं वाटलं नव्हतं. हे सगळं आम्ही उभं केलं ते पत्त्यासारखं कोसळताना नाही पाहावंत, मी रात्री झोपूही शकत नाही. मी फार अस्वस्थ आहे मी आनंदी नाही मी समाधानी नाही आजही माझ्यासमोर बाळासाहेब आहेत ते दिसतायत असं रामदास कदम यांनी म्हटलंय.
आज आमच्यावर ही वेळ का यावी याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे रामदास भाई या बसा आपण बोलू असं विचारायला हवं होतं पण आमची हकालपट्टी केली, याचं मला दु: ख होतं, त्रास होतं अशी खंत रामदार कदम यांनी व्यक्त केली.
मी हात जोडून विनंती केली होती राष्ट्रवादीसोबत बसू नका पण ऐकलं नाही, उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाऊ नका असं सांगितलं होतं. शरद पवारांनी शेवटी डाव साधला, उद्धवजी भोळे आहेत. शरद पवारांचा डाव उद्धवजींना कळला नाही, आमचा पक्ष शरद पवारांनी फोडला असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.
मी स्वत: पत्रकार परिषद घेऊन फोटो मिटिंगसह पत्रकासह उद्धव ठाकरेंना हे दाखवलं होतं की शरद पवार कसा पक्ष फोडत आहेत.
पण तेव्हा त्यांनी ऐकलं नाही असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? ज्या शिवसैनिकांनी उभं आयुष्य शरद पवारांचा विरोध केला आज ते शरद पवार तुम्हाला का हवेत असा प्रश्न संतप्त रामदास कदम यांनी विचारला आहे.
ती गोष्ट माझ्या जीव्हारी लागली...
उद्धव ठाकरे तुम्ही एक गोष्ट त्या दिवशी एक शब्द बोलून गेलात तो माझ्या जिव्हारी लागला. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला तुम्ही मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरण्याचं पुण्य केलं ते लागलं मला. ही वेळ का यावी याचं आत्मपरीक्षक केलं पाहिजे. तुम्ही का शरद पवार आणि सोनिया गांधींना सोडत नाही? या शिवसैनिकांनी काँग्रेविरुद्ध खूप संघर्ष केला त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसायचं आहे?
आज बाळासाहेब ठाकरे असते तर तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करून मुख्यमंत्री व्हा असं कधी म्हणाले असते का? राष्ट्रवादीने अडीच वर्षात वाट लावली त्याचं काय? त्याचा अभ्यास कोण करणार? माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे अजून वेळ गेली नाही. तुम्ही राष्ट्रवादीचा हात सोडा. शिंदेना हाक द्या मी तुमची साथ देईल. आजूबाजूला चोमडे आहेत त्यांना बाजूला करून टाका.
शिवसेना फुटू नये यासाठी प्रयत्न
मी प्रयत्न केला शिवसेना फुटू नये पण मला फार यश आलं नाही बाळासाहेबांची शिवसेना जगली पाहिजे, मराठी, हिंदुत्व जगलं पाहिजे
जे पक्षाच्या मुळावर उठलेत असा आरोप रामदास कदम यांनी केलाय.
उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नव्हती तेव्हा ते मंत्रालयात जात नव्हते. अजित पवारांनी याचा फायदा घेऊन आपला डाव साधला जिथे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत तिथे त्यांचा आमदार जो पडलेला आहे माजी आमदार त्याला फंडा द्यायचा. शिवसेना संपवण्याचा त्यांचा डाव आहे असा आरोपही रामदास कदम यांनी केला.