मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांची तोफ मुंबईत धडाडणार आहे. ७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नारायण राणे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबईतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नारायण राणे यांचा हा मुंबईतील मेळावा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर राणे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण असे दौरे केले होते. नारायण राणे यांनी मुंबईत प्रथमच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले असून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद काय आहे, हे मुंबईकरांना दाखवून देण्यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरु आहे.


मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षकपदाची निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची पुढील खेळी काय असेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. २०१९ लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तसेच होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुशंगाने राणे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार, याकडे लक्ष लागलेय.