मुंबईतील दुर्मिळ झाडांच्या प्रजातींची राणीबाग
भायखळ्यामधील वीर जिजामाता उद्यानात अनेक प्रकारची दुर्मिळ वृक्ष आढळतात
प्रविण दाभोळकर, झी २४ तास, मुंबई : मुंबईत झाडांची संख्या झपाट्याने कमी होत चाललीय. तर अनेक झाडांच्या प्रजाती कायमच्या नष्ट देखील झाल्या आहेत. मात्र भायखळ्यातील राणीच्या बागेत वेगळच चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या भायखळ्यामधील वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेला प्राणीसंग्रहालय म्हणून ओळखलं जातं. मात्र हे केवळ प्राणी संग्रहालय नसून याठिकाणी दुर्मीळ विविध प्रजातींची वृक्ष आणि वनस्पती आहेत. मुंबईत सुमारे साडेतीनशे प्रजातीच्या वनस्पती आणि झाडे आहेत. यापैकी ८० प्रजाती या आपल्याला राणीच्या बागेत पाहायला मिळतील. त्यामुळे वृक्षांच्या या माहेरघराला मुंबईचे हरित फुफ्फुस म्हणूनही ओळखले जाते.
भायखळ्यामधील वीर जिजामाता उद्यानात अनेक प्रकारची दुर्मिळ वृक्ष आढळतात. त्यामध्ये गोरखचिंच, उर्वशी, ब्राऊनिया, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, काजुपूट, कृष्णवड, मुंबई सुगरण, कौलविल्स ग्लोरी, फिश पौयझन ट्री, लेमन सेंटेड गम, कलाबाश, क्रिसेनशिया अलाटा, सेगो पाम, सायकस रुम्फी, पचिरा अक्वेटीका, तिवर, गणेरी, करवटी, कुसुम, मोह, नागकेसर, वायवर्ण, शिवण, कांडोळ, सारडोळ, कुकर, अंकोल, मोठा करमळ, मरोडफली, मैदा-लकडी इत्यादी झाडांचा समावेश होतो.
राणीच्या बागेत विविध प्रजातींची सुमारे साडे चार हजार वृक्ष आहेत. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच गोरखचिंचेचं एक अवाढव्य झाड तुमच्या स्वागतासाठी सज्ज असते. या झाडाचं वय सुमारे पाचशे वर्ष असल्याचे सांगितेले जात आहे. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे झाडाच्या सालींपासून दोर वळली जातात.
राणीच्या बागेतील 'कोको ट्री' हे तर वनस्पती शास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय असतो. कारण या झाडावरील फांद्यांवर उमलणाऱ्या फुलांपासून कोकोची फळं तयार होतात. याचा वापर चॉकलेट्स तयार करण्यासाठी केला जातो. तर कृष्णवड या पानझडी वृक्षाची द्रोणाकार पानेही इथे पाहायला मिळतात, आणि याच द्रोणाकार पानांच्या मदतीने बाळकृष्ण माठातून लोणी चोरत असल्याची अख्यायिका सांगितली जाते.
उद्यानातील प्रमुख आकर्षण म्हणजे येथील 'काजुपूट' या झाडाचे शास्त्रीय नाव 'मॅलॅलुका' असे आहे. या वृक्षाची मऊ साल उश्यांमध्ये भरण्यासाठी वापरतात. त्याचप्रमाणे काजुपूटच्या ताज्या पानांपासून ऊध्वपातन पद्धतीने मिळवलेले तेल कफनिवारक असते. सन १९०० मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील वनस्पती उद्यानातून या झाडाच्या बिया भरतात आणल्या. त्यानंतर बियांपासून अंकुरित केलेली रोपं या उद्यानात वाढवण्यात आली.
मुंबईत क्वचितच दिसणारा 'उर्वशी' निम सदाहरीत वृक्षचे शास्त्रीय नाव 'अॅम्हस्ट्रिया नोबिलीस' असे आहे. उर्वशीचे नैसर्गिक परागीभवन करणारे प्रणी, पक्षी किंवा किटक मुंबईत अढळत नाहीत. त्यामुळे या वृभाच्या बिया येथे रूजत नाहीत. राणीबागेतील शोभिवंत वृक्ष म्हणून लागवड करण्यात आलेल्या 'कॅंडल ट्री'चे नाव 'पर्मेनशिएरा सेरिफेरा' असे आहे. आय.यू.सी.एनच्या रेड लिस्ट ऑफ थ्रेडण्ड स्पिसीज मध्ये या वृक्षाची नोंद धोक्यामध्ये असलेली प्रजाती अशी झालेली आहे. या वनस्पती उद्यानात 'कॅंडल ट्री'चा एकच वृक्ष आहे.
'ऑस्ट्रेलियन चेस्टनट' वृक्षाचे शस्त्रीय नाव 'कॅस्टेनोस्पर्मम ऑस्टेल' असे आहे. या वृक्षाच्या बियांमध्ये असलेल्या कॅस्टेनोस्परमिम नावाच्या नेत्रयुक्त घटकामध्ये कर्करोग आणि एच. आय. व्हि रोधक गुण असल्याचे सांगण्यात आले आहे.
राणी उद्यानाला वारसा मानंकन मिळालेलं 'हेरीटेज' दर्जेचे वनस्पती उद्यान आहे. जर एखाद्याला वनस्पती अभ्यासाक पीएचडी करायची असेल, तर तो फक्त राणीबागेचा अभ्यास करून सुद्धा आपली पीएचडी पूर्ण करू शकतो, असे मत सेव्ह राणीबाग बॉटॅनिकल गार्डन फाऊंडेशन, संस्थापक सदस्य शुभदा निखार्गे यांनी मांडले आहे.