`पालकांनो सगळं मुलांच्या नावे करु नका`, रेमंडच्या विजयपत सिंघानियांचा सल्ला; म्हणाले `मुलाने मला रस्त्यावर...`
गौतम सिंघानियाचे वडील विजयपत सिंघानिया यांनी सांगितलं आहे की, जेव्हा मी त्याला सर्व काही दिलं तेव्हा माझ्याकडे चुकून काही पैसे उरले होते. याच पैशांवरच माझा निवारा सुरु आहे. अन्यथा मी रस्त्यावर आलो असतो.
रेमंड ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया आणि पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यातील घटस्फोटामुळे सध्या वाद निर्माण झालेला असतानाच विजयपत सिंघानिया यांची एंट्री झाली आहे. विजयपत सिंघानिया यांनी आपल्या मुलावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. रेमंड कंपनीला एका छोड्या कंपनीपासून आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवणाऱ्या विजयपत सिंघानिया यांनी म्हटलं आहे की, "मला रस्त्यावर पाहून गौतमला फार आनंद मिळतो".
मुलाच्या नावे सगळं करुन केली चूक
बिजनेस टुडेने दिलेल्या रिपोर्टनुसार, विजयपत सिंघानिया म्हणाले आहेत की, गौतम सिंघानियाला मला रस्त्यावर पाहून आनंद होतो. 2015 मध्ये विजयपत सिंघानिया यांनी गौतम यांच्याकडे रेमंडची मालकी सोपवली होती. आपल्या या निर्णयावर बोलताना त्यांनी ही एक मूर्ख चूक होती असं मान्य केलं. यावेळी त्यांनी गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्या घटस्फोटावरही भाष्य केलं.
पालकांना दिला सल्ला
विजयपत सिंघानिया यांनी आपण मुलाला सर्व काही देणं ही फार मोठी चूक होती असं सांगितलं. आपल्या मुलांना सर्व काही देण्यापूर्वी त्या आई-वडिलांनी फार सावधपणे विचार केला पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
सध्या आपल्या घटस्फोटामुळे चर्चेत असणारे गौतम सिंघानिया यांनी 2017 मध्ये मुंबईतील रेमंड हाऊस म्हणजेच JK House मधून वडील विजयपत सिंघानिया यांना बाहेर काढल्याने चर्चा रंगली होती. 13 नोव्हेंबरला गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावरुन आपलं 32 वर्षांचं नात संपवत असल्याची घोषणा केली होती.
विजयपत सिंघानिया यांनी मुलाखतीत सांगितलं की, "मुलाने बाहेर काढल्यानंतर माझा कोणताच व्यवसाय नाही. गौतम कंपनीतील काही भाग देण्यास तयार झाला होता. पण नंतर त्याने माघार घेतली होती. मी त्याला सर्व काही दिलं होतं. पण चुकून माझ्याकडे काही पैसे राहिले होते. याच पैशांवर सध्या माझा निवारा होत आहे. मी आज वाचलो आहे, अन्यथा रस्त्यावर असतो. जर तो वडिलांना बाहेर काढू शकतो, तर पत्नीलाही काढू शकतो. मला नेमकं काय झालं आहे याची कल्पना नाही".
11 हजार कोटींच्या संपत्तीचे मालक असणाऱे गौतम सिंघानियांची पत्नी नवाज मोदी यांनी घटस्फोटात पोटगी म्हणून आपल्या आणि दोन्ही मुलींच्या नावे संपत्तीमधील 75 टक्के वाटा मागितला आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी गौतम सिंघानिया यांच्यावर त्यांना आणि मुलीला मारहाण केल्याचा आरोप केला.
यावर प्रतिक्रिया देताना विजयपत सिंघानिया म्हणाले, "हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटानंतर पत्नीला 50 टक्के भाग मिळतो. त्यासाठी तिला जास्त लढायची गरज नाही. एखादा साधा वकिलही तिला हे मिळवून देईल. पण गौतम कधी पराभव मानणार नाही. कारण प्रत्येकाला आणि सगळं काही खरेदी करा हे त्याचं ब्रीदवाक्य आहे".