मुंबई : पीएमसी बँकेच्या ग्राहकांना आरबीआयने दिलासा दिला आहे. बँकेतून २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढायला परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचं ट्विट आरबीआयने केलं आहे. यामुळे बँकेच्या ७० टक्के ग्राहकांना त्यांची संपूर्ण रक्कम काढता येणार असल्याचं आरबीआयने म्हणलं आहे. आरबीआय पीएमसी बँकेच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, तसंच ग्राहकांचं हित लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतले जातील, असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमसी बँकेच्या प्रशासकांना मदत करण्यासाठी आरबीआयने ३ सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. २४ सप्टेंबरला सगळ्यात पहिले आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले, तेव्हा ग्राहकांना १ हजार रुपयेच काढण्याची परवानगी देण्यात आली होती. तसंच बँकेने नवीन कर्ज देऊ नये, असंही आरबीआयने सांगितलं होतं.


दरम्यान पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) संचालक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांना अटक केली आहे. तसेच या दोघांची ३५०० कोटी रुपयांची मालमत्ताही गोठवण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँकेकडून थकित कर्जाबद्दलची खोटी माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. विशेष म्हणजे बँकेने दिलेल्या एकूण कर्जापैकी ७५ टक्के कर्ज हे एकट्या एचडीआयएल कंपनीलाच देण्यात आले होते.