उर्जित पटेल १९ नोव्हेंबरला राजीनामा देणार?
येत्या १९ तारखेला केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे.
मुंबई: केंद्र सरकारशी सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल येत्या १९ तारखेला आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. 'मनीलाईफ' या ऑनलाईन वित्तीय प्रकाशनाने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींचे भांडवली बाजारात कशाप्रकारे पडसाद उमटणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
येत्या १९ तारखेला केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीवेळी उर्जित पटेल आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशा विश्वसनीय सूत्रांचा होरा आहे.
केंद्र सरकारशी सुरू असलेल्या वादाचा पटेल यांना उबग आला आहे. याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होत असल्याची उद्विग्नता पटेल यांनी बोलून दाखविल्याची माहिती उर्जित पटेल यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
रिझर्व्ह बँकेकडील राखीव निधीवर केंद्र सरकारची नजर आहे. यावरुन केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्या प्रचंड धुसफुस सुरू आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी सरकार रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा संकोच करत असल्याची जाहीर टीका केली होती. भविष्यात यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते, अशा इशाराही त्यांनी दिला होता.
यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत देशातील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार हे संस्थांपेक्षा लोकप्रतिनिधींनाच हवेत, असा सूर व्यक्त केला होता. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला होता.